गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार

0
37

गोंडवाना विद्यापीठाचे कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन

गडचिरोली: 1 फेब्रुवारी- राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कारचा निर्णय घेऊन राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व सलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशाराही कृती समितीने दिला असून गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी राहणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सतीश पडोळे यांनी दिली आहे.

यापूर्वी 18 डिसेंबर 2021 पासून 11 दिवस चाललेले कामकाज बंद आंदोलन मंत्र्यांच्या आश्वासनावर स्थगित केले होते. तेव्हापासून आजपर्यंत प्रलंबीत मागण्यांची सोडवणूक झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या पक्षपाती व अन्यायकारक भूमिकेमुळे विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले असून कर्मचारी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर २० फेब्रुवारी २०२३ पासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनानी स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासनाशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षेची यंत्रणा कोलमडणार आहे. याची नोटीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना १३ जानेवारी२०२३च्या पत्रान्वये देण्यात आले असून या कृती समितीद्वारे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठाचे सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याबाबत निवेदन, कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव सतीश पडोळे, पदाधिकारी प्रवीण पहानपटे, महादेव वासेकर, अविनाश सिडाम, सुचिता मोरे तसेच इतरही कर्मचारी उपस्थित होते.

या आहेत सहा प्रमुख मागण्या :

१) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.
३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.
४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.
५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा
——
आंदोलनाचे टप्पे :
१) २ फेब्रुवारी २०२३ पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार.
२)१४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० ते २.३० अवकाश काळात निदर्शने.
३)१५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे.
४) १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप.
५) २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद,

आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आंदोलनाचे टप्पे व रुपरेषा- पहिला टप्पा 2 फेब्रुवारीपासून परिक्षा विषयक कामकाजावर बहिष्कार,
दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी पासून निदर्शने,
तीसरा टप्प्पा 15 फेब्रुवारी पासून काळ्या फिती लावून कामकाज, चौथा टप्पा 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, पाचवा टप्पा 20 फेब्रुवारी पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयात बेमुदत लेखणी बंद आंदोलन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here