गडचिरोली: सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सोनार समाज गडचिरोली तर्फे बुधवार, ८ फेब्रुवारी रोजी शहरात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी गडचिरोली शहरातून संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनार समाजाचे अध्यक्ष बंडू कारेमोरे, तर विशेष अतिथी म्हणून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, चंद्रपूरचे अध्यक्ष प्रफुल चावरे, सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर बोगोजुवार आदी मंचावर उपस्थित राहणार आहे. सकाळी ९ वाजता मुक्त हस्त व टिंबांची रांगोळी स्पर्धा, सकाळी १० वाजता घटस्थापना व श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी १०:३० वाजता पालखी मिरवणूक त्यानंतर अल्पोपहार होणार आहे. त्यानंतर दुपारी २:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वयोवृद्धांचा सत्कार करण्यात येणार आहे. विशेष कामगिरी करणाऱ्यांचा गौरव, दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार, सायंकाळी ५:३० वाजता गोपालकाला, आरती व लगेच स्पर्धेला सुरुवात आणि महाप्रसाद, खुली वक्तृत्व स्पर्धा तसेच मराठी गीत गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत.
कार्यक्रमाला सोनार समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष डेडूजी बेहरे, महिला उपाध्यक्षा अल्का खरवडे, कोषाध्यक्ष प्रमोद बेहरे, सचिव अशोक हाडगे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गजेंद्र डोमळे, जगदीश डोमळे, सुषमा येवले, रमेश भरणे, अरुण पोगळे, राकेश इनकने, पुरुषोत्तम कुर्वे आदींनी केले आहे.