रस्ता बांधकामात चक्क वनतलावातील पाण्याचा वापर, वडदम उपक्षेत्र हद्दीतील प्रकार

0
19

गडचिरोली/सिरोंचा:-ऊन्हाळ्याच्या कालावधीत जंगलातील वन्यजीवांची पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाद्वारे वनतलाव निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या वनतलावातील पाण्याचा वापर चक्क रस्ता बांधकामासाठी होत असल्याचा प्रकार सिरोंचा वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वडदम उपक्षेत्र हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संबंधित कंत्राटदार तसेच वनाधिका-यांच्या कारभाराप्रती प्रश्न उपस्थित होत आहेत.
ऊन्हाची दाहकता वाढताच मनुष्य प्राण्यासोबतच वन्यजीवांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु असते. ऊन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत असल्याने जंगलातील वन्यजीव पाण्यासाठी चक्क गाव परिसरातही प्रवेश करण्याची शक्यता असते. यातून वन्यजीव संघर्ष तसेच शिकारीचे प्रकार वाढीस येतात. याकरिता वनविभागाच्या वतीने जंगल परिसरातच वनतलाव उभारुन वन्यजीवांची पाण्याची तहान भागवित असतात. प्रखर उन्हात तर वनतलावात टॅंकरनेही पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सिरोंचा वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वडदम उपक्षेत्रातही ऊन्हाळ्यात वन्यजीवांची पाण्याची तहान भागविण्यासाठी वनतलाव उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत या तलावात मुबलक पाणी उपलब्ध आहे. या परिसरालगत संबंधित कंत्राटदारामार्फत रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र या कामात वनतलावातील पाणी टॅंकरमध्ये भरुन चक्क रस्ता बांधकामात वापरले जात आहे. वनप्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास हा प्रकार सुरु असल्याने संबंधित कंत्राटदार व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांमध्ये संगनमत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनतलावातील पाण्याचा उपसा न थांबल्यास सदर वनतलाव कोरडे पडून पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन वन्यप्राण्याचे जीव धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकारामुळे सिरोंचा उपवनंसरक्षकांच्या बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने घेत संबंधित दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उपवनसंरक्षकांच्या बेजबाबदारपणाचा कळस
वडदम उपवन क्षेत्रातील वनतलावातील राजरोसपणे पाण्याचा उपसा करुन टॅंकरद्वारे रस्ता बांधकामावर नेले जात आहे. प्रखर ऊन्हाळ्यात यामुळे वन्यजीवांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वनप्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरु असल्याने यात संबंधित कंत्राटदार व वनाधिका-यांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड, गौण खनिज उत्खनन, वाहतूकीसंदर्भात अनेकदा वरिष्ठांसह शासनाकडे तक्रारी केल्या. मात्र यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अशातच वनतलावाचे पाणी रस्ता बांधकामात वापरले जात असल्याने पुन्हा एकदा सिरोंचा उपवनसंरक्षकानी बेजबाबदारपणाचा कळस गाठल्याचे यावुरन स्पष्ट होत आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here