नोकरीसाठी जोडले प्रकल्पग्रस्ताचे खोटे प्रमाणपत्र पोलिसांत भरती झालेल्या युवकांना अटक

0
104

गडचिरोली:-पोलिसात नोकरी मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडणाऱ्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोली पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. यात सर्वसाधारण, एससी, एसटी, महिला, प्रकल्पग्रस्त, खेळाडू अशा कोट्यातून उमेदवार निवडले गेले. निवड झालेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांच्या अंतिम छाननीच्या वेळी एका निनावी तक्रारदाराच्या तक्रारी वरुन पडताळणी केली असता प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातील उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास सुरू केला. आरोपींना याची भनक लागताच ते दोन दिवसांपूर्वी फरार झाले. मात्र एलसीबीने शनिवारी यातील पाच ते सहा युवकांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. अशाच प्रकारे खेळाडूंच्या आरक्षणातही पात्र ठरलेल्या जवळपास नऊ युवकांनी खोटे क्रीडा प्रमाणपत्र जोडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचीही चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनेला दुजोरा दिला असला तरी विस्तृत माहिती व आरोपींची नावे देण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here