युवापिढीने आदिवासींसाठी देवदूत बनावे : डॉ.श्रीपाल सबनीस

0
14

एटापल्ली’च्या ४० विकासदूतांसाठी सुरजागड (गडचिरोली) येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रा. लि. आणि त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय व्हीलेज आउटरीच सेंटरमधील विकासदूत प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप.

पुणे : दुर्गम भागात, जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला रस्ते, वीज, पाणी आदी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात येण्याची संधी द्यायला हवी. युवापिढीने शिक्षण घेऊन विकासाचा मार्ग आदिवासींपर्यंत घेऊन जावा व त्यांच्यासाठी देवदूताप्रमाणे विकासदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

सुरजागड (गडचिरोली) येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रा. लि. आणि त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय व्हीलेज आउटरीच सेंटरमधील विकासदूत प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाला. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी माजी प्रधान सचिव डॉ. उज्ज्वल उके, लॉयड्स मेटल अँड एनर्जीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एल. साईकुमार, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संस्थापक प्रज्ञा वाघमारे, राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “आदिवासी संस्कृती समृद्ध आहे. या समाजाने अनेक क्रांतिकारक, लेखक, साहित्यिक दिले आहेत. संस्कृतीचा, पर्यावरणाचा वारसा जोपासणारा हा समाज आहे. शासन, राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र, या समाजाकडे म्हणावे तितके लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात अजूनही विकास पोहोचलेला नाही. पायाभूत सुविधांसह शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर आदिवासींचे जीवनमान उंचावेल. आदिवासींच्या भल्यासाठी त्रिशरण फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”

डॉ. उज्वल उके म्हणाले, “मूलभूत शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे हा विकास आहे. या सोयीसुविधा आपापल्या गावात नेण्याचे काम विकासदूत म्हणून तुम्हाला करायचे आहे. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचा आवाज बना. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भले झाले, तर जगण्याचे सार्थक झाले, असे समजावे.”

एल. साई कुमार म्हणाले, “गडचिरोलीत लोहखनिज आहे, तसे जनतारूपी हिरे ही आहेत. या हिऱ्यांना थोडे पॉलिश केले, तर तेही इतरांप्रमाणे चमकतील, या विचारातून ‘लॉयड्स’चे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी आउटरीच सेंटर सुरु करत असून, या माध्यमातून शासकीय योजना व ‘लॉयड्स’च्या सीएसआर योजना गावागावात पोहोचतील. मागील महिन्यात १५. एप्रिल रोजी आम्ही एटापल्ली तालुक्यातील हेडरी या गावात नियोजित सी.बी.एस.सी शाळा, सर्व सुविधायुक्त असणारे रूग्णालय, आणि महिलांसाठी भव्य असे शिवणकला प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पाडला येणाऱ्या काही
महिण्यामध्ये तिथे या सुविधा स्थानिकांसाठी उपलब्ध होतील.

प्रज्ञा वाघमारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या मुलांमध्ये खूप काही करण्याची जिद्द आहे. त्यांना स्वप्ने दाखवली, तर ते त्याच्या पूर्ततेसाठी समर्पित भावनेने काम करतात. गाव-तालुक्याबाहेर आपण जाऊ शकतो, इतरांप्रमाणे आपण जगू शकतो, याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला आहे. विकासदूताचा प्रयोग आपल्यात आणि त्यांच्यात असणारे अंतर कमी करून त्यांना जोडणारा हा पूल आहे.एटापल्लीच्या २०-२२ गावांतून आलेल्या तरुणांना विकासदूत म्हणून प्रशिक्षित केले आहे. व्यक्तिमत्व विकास, सार्वजनिक वर्तणूक, तंत्रज्ञान आदींचे प्रशिक्षण त्यांना मिळाले. दहा दिवसांत या ४० विकासदूतांना बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे मेट्रोची सफर, आदिवासी विभागाचे कार्यालय व संग्रहालय, वर्तमानपत्राचे कार्यालय, छापखाना आदी गोष्टी दाखवण्यात आल्या.

प्रशिक्षणादरम्यान आदिवासी विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, कृषी आयुक्तालयातील अधिकारी विश्वजित सरकाळे, वरिष्ठ पत्रकार अरुण खोरे, सम्राट फडणीस, स्वप्नील पोरे, पुणे मेट्रोचे हेमंत सोनावणे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशांत वाघमारे यांनी आउटरीच सेंटर व तेथील प्रशिक्षणाविषयी सांगितले. जिल्हा समन्वयक मंगलदास मशाखेत्री यांनी सूत्रसंचालन केले. रचना कांबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here