विद्यार्थीनी, महिलेवरील अत्याचाराने हादरला जिल्हा – आलापल्ली प्रकरणात दोघांना तर गडचिरोली प्रकरणात एकास अटक

0
43

प्रतिनिधी/ गडचिरोली- महिला सक्षमीकरणाचा उदो उदो केला जात असतांना गडचिरोली जिल्ह्यात महिलावरील अत्याचाराची दोन प्रकरणे घडली आहेत. यामुळे महिलावरील अत्याचाराने जिल्हा हादरला आहे. दरम्यान आलापल्ली प्रकरणात दोघांना तर गडचिरोली येथील प्रकरणात एका नराधमास अटक करण्यात आली आहे.

आलापल्ली येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार
एटापल्ली-दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे १० जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (२३) रा. आलापल्ली व नेहाल कुंभारे (२४) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली अशी आरोपींची नावे आहेत.
एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर नेहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले. त्यानंतर संध्याकाळी रोशन गोडसेलवार व नेहाल कुंभारे यांनी त्या मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला. संध्याकाळी तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावर घडलेला प्रसंग जोरजोराने ओरडून सांगितला. मात्र, काही नागरिकांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर ती रात्री एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. काल रविवारी ४ वाजता कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. रविवारी रात्री उशिरा अहेरी पोलिसांनी आरोपी रोशन गोडसेलवार व नेहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून पोस्को कायदा अधिनियम नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी केली.

घरी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलेवर केला बलात्कार
-गडचिरोली शहरातील हनुमान वार्डातील घटना
गडचिरोली – आरोपीच्या पत्नीच्या सांगण्यावरून पिडीत महिला आरोपीच्या घरी कपडे धुण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी पिडीतेने ८ जून रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.दिनेश दशरथ वैरागडे, रा. हनुमान वार्ड, गडचिरोली असे आरोपीचे नांव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी हा पिडीतेच्या पतीच्या मेहुणीचा पती आहे.आरोपीची पत्नी गावी गेली होती. तिने पिडीतेस फोन करून आपल्याघरचे कपडे धुऊन देण्यास सांगितले. यानुसार पिडीता आरोपीच्या घरी गेली व तिने कपडे धुऊन दिले. तिने पैशाची मागणी केली असता आरोपीने दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्च्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर त्याने पिडीतेला अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. भितीमुळे सुरवातीला तिने आपल्या पतीस माहिती दिली नाही. मात्र यानंतर हिंमत करून पतीला माहिती दिली व गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि ३७६(2)एफ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात  पोलिस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे हे करित आसल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here