गडचिरोली : शहरातील बेहरे आर्टचे मालक युवराज बेहरे हे कुटुंबासह राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी गेले होते. या पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर परत गडचिरोलीकडे येत असताना त्यांच्या कारचा अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळीजवळ रविवारी (१८ जून) पहाटे ४ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात युवराज बेहरे व त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी विभा बेहरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. उपचारादरम्यान सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास युवराज बेहरे यांचे निधन झाले.
मृतक युवराज व्यंकटी बेहरे (वय ५०) रा. कन्नमवार वॉर्ड गडचिरोली, गंभीर जखमी पत्नी विभा युवराज बेहरे व त्यांची मुले ही दोन, चार दिवसांपूर्वी आपल्या कारने महाबळेश्वर या ठिकाणी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास परत गडचिरोलीकडे येत असताना त्यांचा अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळी गावाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात भीषण असल्याने युवराज बेहरे व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारार्थ नागपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, युवराज बेहरे हे सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मृत्यू पावले. त्यांची मुले ही मागच्या कारमध्ये असल्याची माहिती असून ते सुखरूप आहेत. या अपघातात त्यांची पत्नी विभा या गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून युवराज बेहरे हे गडचिरोली शहरात पेंटर म्हणून काम करत होते. ते सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनातर्फे आयोजित कार्यक्रमात सुरेख रांगोळी काढत असल्याने ते सर्वांच्याच परिचयाचे होते. आपल्या कलेने ते सर्वांच्या मनावर अधिराज्य केले होते. युवराज बेहरे अंत्यत मनमिळावू, प्रेमळ व्यक्ती असल्याने सर्वांचे ते आवडते होते. गडचिरोली शहरासह परिसरात बेहरे पेंटर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अपघाती निधनाने गडचिरोली शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.अंत्यविधी उदया सकाळी 8 वाजता कटाणी नदी घाटावर होणार आहे.