प्रज्ञा संस्कार मध्ये ईव्हीएम वर मतदान तर एसडीओंच्या उपस्थितीत शपथविधी

0
21

गडचिरोली:-दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेन्ट येथे संस्थाध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या निवडणूका पार पडल्या. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी व भारतीय निवडणूक पद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुका पार पडल्या. सदरच्या निवडणुकांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना एकूण चार गटात विभागण्यात आले, त्यानंतर चारही गटाच्या प्रतिनिधींनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकी द्वारे निवडणूक अर्ज सादर केले. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. गटांना चिन्ह वाटप करण्यात आले. मार्गदर्शक शिक्षकांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आपल्या गटाचा प्रचार केला. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी वेळोवेळी आचारसंहितेचे महत्त्व पटवून दिले. प्रचार संपल्यानंतर बूथ रचना करून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिये दरम्यान मुख्य निवडणूक प्रमुख म्हणून नवनियुक्त बी डी ओ महेश वाढई उपस्थित होते. मतदानानंतर मतमोजणी करून मुख्य निवडणूक प्रमुख यांनी निकाल घोषित केला.

मुख्यमंत्री म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी साई घसगंटीवार याची निवड करण्यात आली. सोबतच इतर सात मंत्री निवडण्यात आले. नवनियुक्त मंत्रिमंडळाचा शपथविधी गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नवनियुक्त मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. सोबतच नवनियुक्त मंत्र्यांनी शाळा व विद्यार्थी यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. मंत्रिमंडळाने इंग्रजी, मराठी,हिंदी संस्कृत,उर्दू,बंगाली, तेलगू व गुजराती भाषेत शपथ घेतली. यावेळी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शपथ देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित गडचिरोली चे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी लोकशाही देशातील विद्यार्थ्यांना आपल्या राजकीय व प्रशासकीय बाबींची माहिती आवश्यक असल्याचे नमूद केले, त्यासाठी सदरचा प्रत्यक्ष अनुभव देणारा उपक्रम आवश्यक असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवताना प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचे असतात, त्यासाठी शाळांनी असे उपक्रम राबवावे असे मत व्यक्त केले. सोबतच स्पर्धा परीक्षा व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची व त्यांची गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध साधन संपत्ती याचा विचार करून आपले पुढील करियर निवडावे असे आव्हान केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. सुरेश लडके यांनी प्रज्ञा संस्कार नेहमीच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारी उपक्रमशील शाळा म्हणून काम करेल असे आश्वासित केले.

यावेळी समूह नृत्य सादर करण्यात आले.

उपक्रमाचे प्रमुख सुरज चलाख यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षिका रिझवाना पठाण, प्रभारी आशिष ढोले, विभाग प्रमुख नंदिनी मोहूर्ले, शुभांगी बानबले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चेतन गोरे, संचालन अदिती उपरवार तर आभार जयश्री टप्पे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here