गडचिरोली:-थरार आणि जल्लोषाचा धुमधडाका घेऊन ‘मच गया शोर, सारी नगरी रे’, ‘आला रे आला, गोविंदा आला’ असे म्हणत उद्या, गुरुवार 7 सप्टेंबर रोजी आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यातील गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज झाला आहे. कोराना काळ वगळता मागील वर्षीपासून सदर उत्सव त्याच जोमाने साजरा केला जात आहे. यंदाही आयोजकांनी दरवर्षीप्रमाणे दहीहंडीसाठी जय्यत तयारी केली असून साहस, थरार उत्कंठा व जोशपूर्ण वातावरणात पावसांच्या सरीसोबत दहीहंडीचा उत्साह गोविंदासह शहरवासीयांमध्ये संचारणार आहे.
कोरोना कालावधीतील निर्बंधामुळे सलग दोन वर्षे सण, उत्सवावर विरझण पडले होते. मात्र मागील वर्षीपासून सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. यंदाही त्याच जोशात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. विशेषत: दहीहंडीचा सण म्हटला की, बाळगोपालासंह तरुणांमध्ये नवचैतन्य संचारते. गुरुवारी दहीहंडी उत्सवासाठी आयोजकही सज्ज झाले आहेत. शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर गडचिरोली आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी स्पर्धा पार पडते. आयोजकांद्वारे दहीहंडी स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली असून आयोजक, गोविंदा पथकांसह सर्वसामान्य नागरिकांचाही उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शुक्रवारी ख-या अर्थाने गडचिरोली शहरासह जिल्ह्यातह ‘गोविंदा आला रे आला’ चा जयघोष दुमदुमणार आहे.
उद्या गोविंदा पथकाचा लागणार कस
दहीहंडी सणात बाळगोपालांसह तरुणांमध्ये वेगळेच नवचैतन्य संचारते. दहीहंडी स्पर्धेसाठी गोविंदा पथकाद्वारे दोन महिन्यांपासून एकावर एक मानवी थर लावण्याचा सराव सुरु असतो. या पथकांचा दहीहंडीच्या दिवशी ख-या अर्थाने तयारीचा कस लागणार आहे. त्यामुळे अवघ्या चोवीस तासावर आलेल्या सणाकरिता गोविंदा पथकांसह आयोजकांमध्येही उत्साह संचारला आहे.
अभिनव लॉन येथे रंगणार दहीहंडीचा थरार
गडचिरोली शहरातील अभिनव लॉन येथे दरवर्षी गोपाळकाला सणानिमित्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर गडचिरोली, श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने दहीहंडी स्पर्धा पार पडणार आहे. आयोजकांनी स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली असून सर्वप्रथम श्रीराम मंदिरापासून ते आरमोरी मार्ग-इंदिरा गांधी चौक ते चंद्रपूर मार्गे अभिनव लॉनपर्यंत शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता दहीहंडी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे अध्यक्ष नितेश खडसे, उपाध्यक्ष रोशन आखाडे, संयोजक राकेश नैताम, अनिल तिडके, रुपराज वाकोडे, गजेंद्र डोमळे,हर्षल गेडाम,सुभाष उपलावर, गणेश नैताम, जित मंडल, विकी नैताम, विक्की कोत्तावार,आशिष जुआरे, प्रतीक चीचघरे,कैलास भांडेकर,कुणाल भांडेकर,बबलू भांडेकर,पवन वासेकर, निलेश सोमनकर यांचेसह समस्त बजरंग दलाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
दहीहंडी स्पर्धेसाठी सज्ज
दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर गडचिरोली व श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वाजता प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यात बजरंग दलाचे 6 गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी शहरातील राममंदिरातून रॅली काढून अभिनव लॉन येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. दहीहंडी स्पर्धेसाठी गोविंदा पथकांसह आम्हा आयोजकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
नितेश उर्फ बंटी खडसे, नगराध्यक्ष बजरंग दल,विहिप