बेपत्ता दुचाकीस्वाराचा शोध सुरू!
चामोर्शी- दिनांक:-08/10/2023 गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून दुचाकी थेट नदीत कोसळल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार नदीच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
किशोर गणपती वासेकर वय ३२ वर्ष रा. कुनघाडा माल ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, कुनघाडा माल येथील किशोर वासेकर हा काही कामानिमित्त विठ्ठलवाडा येथे गेला असता तिथून गावाकडे परत येत असताना त्याचा वडील गणपती वासेकर वय अंदाजे ६७ व कुनघाडा येथील शुभम बोलगोडवार वय २५असे तिघे जण दुचाकीवरून प्रवास करीत होते. वैनगंगा नदीच्या पुलावर खड्डे असल्याने दुचाकी खड्ड्यामुळे घसरली व थेट नदीत कोसळली यावेळी मागे बसून असलेला शुभम बोलगोडवार हा पुलावरच पडला तर किशोर व त्याचे वडील थेट नदीतच कोसळले. यावेळी ये जा करणाऱ्यानी दोरी टाकून दोघांना वाचविण्याचा खुप प्रयत्न केला. यावेळी वडिलांना वाचविण्यात यश आले मात्र दुचाकीस्वार किशोर वसेकार हा पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व बेपत्ता किशोरचा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले. मात्र त्याचा शोध अद्यापही लागला नसून गोंडपीपरी पोलिस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे.
बेपत्ता किशोर वासेकर हा सुरजागड लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रक च्या वाहतूक व्यवस्था बघणाऱ्या सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता.वैनगंगा नदीवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले हे खड्डे बुजविण्यात यावे अशी वारंवार मागणी केली जात असली तरी प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यामुळे अजून कित्येकांचा जीव जाणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.