तानबोडी येथील १७ वर्षीय रोशन मडावीचा जागीच मृत्यू, चार युवक जखमी ; विजयपूर येथे झाला अपघात..

0
35

अनियंत्रित गाडीची झाडाला जोरदार धडक ; अंधार असल्याने गाडी झाली अनियंत्रित !!

अहेरी :- अहेरी तालुक्यातील विजयपूर येथे आज झालेल्या अपघातात दारूच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वायांनी झाडाला जोरदार धडक दिल्याने तानबोडी येथील अवघ्या १७ वर्षीय रोशन संतोष मडावी या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले चार युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोशन मडावी हा आपल्या चार मित्रांसह काही वैयक्तिक कामानिमित्त विजयपूर परिसरातून जात होता. रात्रीची वेळ असल्यामुळे आणि सदर गाडीवरील तरुण हे नशा करून असल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन झाडाला धडकली आणि गाडीचा वेग जास्त असल्यामुळे धडक इतकी भीषण होती की रोशन मडावी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नशा पाणी न घेता चांगल्या आणि शुद्ध मनभावनेने प्रवास झाला तर स्वतःच जीव वाचवता येऊ शकतो अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी चौकशी आणि कारवाईची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. परिणामी निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रोशन मडावी हा अल्पवयीन आणि कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला युवक होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे तानबोडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोकमय वातावरण असून नातेवाईक व ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here