गडचिरोली (घोट) दि. 10 फेब्रुवारी 2025 – प्राथमिक आरोग्य केंद्र, घोट येथे आज राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन घोट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रुपाली दुधबावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, घोटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हजारे आणि डॉ. पिपरे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग निर्मूलनासाठी औषधोपचार तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी बोलताना सरपंच रुपाली दुधबावरे म्हणाल्या, “या मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकाला कीटकजन्य रोगांपासून संरक्षण मिळावे, ही आमची प्राथमिकता आहे. आरोग्य केंद्राच्या सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य करू.”
डॉ. हजारे आणि डॉ. पिपरे यांनी हत्तीरोग नियंत्रणासाठी होणाऱ्या औषधोपचार मोहिमेचे महत्त्व स्पष्ट केले आणि नागरिकांनी औषधोपचार नियमितपणे घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.