नवी दिल्ली : इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सी.डी.देशमुख ऑडिटोरियम, लोधी रोड येथे ‘ह्युमन सेफ्टी आणि सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षा’ या ज्वलंत विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रायझिंग इंडिया या प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार आणि अभ्यासकांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात दिल्लीतील सहा कर्तबगार महिला सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रातून विशेष आमंत्रित ऍड. कविता मोहरकर यांनी महिलांच्या सुरक्षेशी संबंधित समस्या, त्यावरील उपाययोजना आणि धोरणात्मक बदल यावर स्पष्ट आणि प्रभावी विचार मांडले. त्यांच्या परखड मांडणीमुळे उपस्थित मान्यवर प्रभावित झाले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांना ‘रायझिंग ह्युमन इंडिया अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक धोरणे आणि उपाययोजनांवर सखोल चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित राहण्यासाठी समाज आणि प्रशासनाने कोणत्या ठोस पावले उचलली पाहिजेत, यावरही विचारमंथन करण्यात आले. विशेषतः ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या पत्रकारांनी या चर्चासत्राला विशेष प्राधान्य दिले आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
या चर्चासत्रामुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला असून, भविष्यात अधिक ठोस उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रायझिंग इंडिया आणि सहभागी मान्यवरांनी या विषयावर सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.