उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना

0
155

गडचिरोली:- १००० सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन

• विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, ११३ बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट श्री. जसवीर सिंग, ०९ बटा. चे कमांडण्ट श्री. शंभु कुमार, ३७ बटा. चे कमांडण्ट श्री. दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन

मागील वर्षी १४ जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती. नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल… पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल

माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक ३०/०१/२०२५ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन २०२४ या वर्षाअखेर दिनांक ११/१२/२०२४ रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागड पासून २० किमी., धोडराज पासुन १४ किमी., पोमकें पेनगुंडा पासुन ०४ कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त ६०० मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १०५० मनुष्यबळ, १० जेसीबी, १९ ट्रेलर, ०४ पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, १९ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लैंट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ०८ सॅन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ४९ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप १०, सोलापूरचे ०२ प्लाटुन तसेच सिआरपीएफ ११३ बटा. डी कंपणीचे ०१ असिस्टंट कमांडन्ट व ६९ अंमलदार, विशेष अभियान पथकाचे ०६ पथक (१५० कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली श्री. अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, कमांडण्ट ११३ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल श्री. जसवीर सिंग, कमांडण्ट ०९ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल श्री. शंभु कुमार, कमांडण्ट ३७ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल श्री. दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते व पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here