रणभूमी न्यूज|गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोह उत्खननाच्या विस्तारित प्रकल्पासह हेडरी, बांडे व परसलगोंदी येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जनसुनावणी पार पडली.. यावेळी प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण रोजगारासह पायाभूत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांची मंचावर उपस्थिती होती.
अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, लॉयड मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीत स्थानिक महिलांनी आपले मत व्यक्त केले.
रस्ते, पूल, शाळा, रुग्णालयाची मागणी
प्रकल्पबाधित परिसर नक्षलप्रभावित व अतिदुर्गम आहे. याठिकाणी रस्ते, पूल, उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा, मल्टीस्पेशालिटी दवाखाना आदी सुविधांची मागणी स्थानिकांनी लावून धरली. पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे, प्रकल्पातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य राहील. यामुळे या भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. अतिसंवेदनशील असलेला हा भाग विकासाकडे ड्रोपावत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या उभारणीला समर्थन दिल्याबद्दल जनतेचा आभारी आहे. परिसरातील बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार देण्यात येईल. कंपनीच्या सामाजिक कामातून या भागातील पायाभूत सुविधांवर काम करण्याचे नियोजन आहे. कौशल्याधारित शिक्षणासाठी काही मुलांना ऑस्ट्रेलियाला पाठवले आहे. हेडरी येथील हॉस्पिटलची खाटांची क्षमता ३० आहे, ती १०० खाटांपर्यंत वाढविण्यात येईल.
बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक, लॉयड मेटल्स ड. एनर्जी लि.










