एटापल्ली, ५ मे २०२५ — लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने एटापल्ली तालुक्यात दारूच्या सेवनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अनेक नागरिक दारूच्या नशेत वाहन चालवत आहेत. विशेषतः एटापल्ली-गट्टा मार्गावर हे प्रमाण अधिक असून, यामुळे अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
अनेक वेळा हे चालक अल्पवयीन असून, नशेत वाहन चालवताना नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
अशाच एका घटनेत ५ मे रोजी परसलगोंदी जवळ गुट्टा-झारेवाडा येथील राजू हिचामी नावाचा युवक दारूच्या नशेत दुचाकी चालवत असताना रस्त्यावर असलेल्या बैलाला धडक दिल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, एटापल्ली तालुक्यात वाहन परवाना तपासणी, हेल्मेट सक्ती आणि नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.